सिल्लोड शहरात पुन्हा गॅरेज फोडून चोरी; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

Foto
गेल्या आठवड्यातील दोन चोऱ्यांनंतर तिसरी घटना

सिल्लोड, (प्रतिनिधी) :  शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन चोरीच्या घटनांनंतर सोमवारी मध्यरात्री ट्रक गॅरेज फोडून चोरीची तिसरी घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गॅरेजचे कुलूप तोडून ट्रकचे सुटे भाग व जॅक असा सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
  
शहरातील नामदारखा सुलेमानखा पठाण (वय ६०) यांचे ट्रक गॅरेज आहे. ते सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सुमारे ९ वाजता गॅरेज बंद करून घरी गेले होते. रात्री ९ ते मंगळवारी पहाटे ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅरेजचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ट्रकचे सुटे साहित्य व जॅक चोरी करून नेले. घटनेची माहिती मिळताच नामदारखा पठाण यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहेकॉ. लोधवाल करीत आहेत. शहरात अल्पावधीतच सलग तीन चोरीच्या घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.